नवी दिल्ली -इटलीहून पंजाबच्या अमृतसरमध्ये दाखल झालेले आणखी 173 प्रवासी शुक्रवारी करोनाबाधित आढळले. एक दिवस आधीच त्या देशातून अमृतसरमध्ये आलेल्या 125 प्रवाशांच्या करोनाविषयक चाचण्यांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह निघाले होते.
इटलीच्या रोममधून 285 प्रवाशांना घेऊन एक विमान शुक्रवारी अमृतसर विमानतळावर पोहचले. तिथे प्रवाशांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी बाधित असल्याचे आढळले. त्यांना विलगीकरण केंद्रांमध्ये हलवण्यात आले.
गुरूवारी आढळलेले करोनाबाधित प्रवासी इटलीच्या मिलानमधून आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इटलीसह सर्व युरोपीय देशांना जोखमीचे देश ठरवले आहे. त्या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या विमानतळांवरच करोनाविषयक चाचण्या घेतल्या जात आहेत.