मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर शीतल म्हात्रेंनी हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप करत पोलीस तक्रारी केली. याप्रकरणी गुन्हादेखील दाखल झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली.
शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओविषयी बोलताना रुपाली ठोंबरे यांनी,“शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ आहे किंवा नाही हे तपासावं आणि ज्याने व्हिडीओ व्हायरल केला असेल त्याच्यावर कारवाई करावी. शीतल म्हात्रेंना मला सांगायचं आहे की, त्यांनी जे पेरलं ते उगवताना दिसत आहे. त्याचाच त्यांना त्रास होत आहे. आम्ही विरोधक महिला असलो तरी या गोष्टींना थारा देणार नाही.”असे ठणकावुन सांगितले आहे.
पुढे बोलताना त्यांनी,”तो व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. एखाद्या महिलेचा असा मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय आहे. ज्याने हे केलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मात्र, अशा इतर अनेक महिलांचे व्हिडीओ टाकण्यात आले परंतु, भाजपा आणि शिंदे गटाकडून त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळेच समाजात ही हिंमत वाढली आहे,” असे मत रुपाली ठोंबरेंनी व्यक्त केले.
रुपाली ठोंबरे पुढे म्हणाल्या, “हा व्हिडीओ खरा आहे की खोटा हे तपास केल्याशिवाय कळणार नाही. मला वाटतं की, मुळात राजकारणी महिला अशाप्रकारच्या मिरवणुकीत असं कोणतंही कृत्य करताना दिसणार नाहीत याची खात्री आहे. वाईट वाटलं की, एखाद्या महिलेचा असा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.” “शीतल म्हात्रेंना वाटत असेल की हे विरोधकांनी केलं. मात्र, मला त्यांना सांगायचं की, त्यांच्या गटातील आणि ते सत्तेत ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्या लोकांनी हा व्हिडीओ व्हायरल केला नाही ना याचा तपास झाला पाहिजे,” अशी मागणी रुपाली ठोंबरेंनी केली.