अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला मंजुरी दिल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशनमध्ये होता आणि यामुळे त्याने आत्महत्येसारखं पाऊल उचललं अशी चर्चा झाली.
दरम्यान सुशांतची आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे, असा सातत्याने आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणावतने अप्रत्यक्षपणे अभिनेत्री दीपिका पादुकोणवर निशाणा साधला आहे. कंगना रणावतने एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र हे ट्वीट दीपिकाला उद्देशून करण्यात आल्याचे समजते.
कंगनाने ट्वीट केले की, माझ्यामागून बोला. डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं “औकात’ दाखवली.
दरम्यान, दीपिकानेदेखील डिप्रेशनचा सामना केला आहे. त्यातून बाहेर पडल्यानंतर तिने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. सुशांतच्या मृत्यूलाही तिनं डिप्रेशनशी जोडले. सुशांतच्या मृत्यूनंतर दीपिकाने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती.
दीपिका पोस्टमध्ये म्हणाली होती, माझ्या मागून बोला, डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे दुखी होणं नाही, माझ्या मागून बोला तुम्ही डिप्रेशनपासून कधीच दूर पळू शकत नाही. कंगनानेदेखील आपल्या या ट्वीटमध्ये दीपिकाच्या माझ्या मागून बोला या वाक्याचा उपयोग केला आहे. ज्यावरून तिने हे दीपिकाला उद्देशूनच म्हटल्याचे स्पष्ट होते.