करोनाबाधित जावयाच्या संपर्कात आलेले पाठविले नगरला

राहाता (प्रतिनिधी) – तालुक्यातील अस्तगाव येथे ठाणे येथून आलेला जावई करोना पॉझिटिव्ह निघाला. या जावयास गावात राहण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने त्यास त्याच्या मूळ गावी सोडण्यात आले होते. मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे.

ठाणे येथे नोकरीस असलेला व मूळचा नाशिक जिल्ह्यातील निफाड जवळील उगावची रहिवासी असलेला एक जावई तीन दिवसांपूर्वी बायको व दोन लहान मुलांसह अस्तगाव येथे सासूरवाडीस आला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व ग्रामपंचायतीने ते बाहेर गावचे आहेत, या मुद्यावर त्यांना क्वरांटाईन करण्यास विरोध केला होता. त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी प्रथम दर्शनी कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र यावेळी सरपंचाच्या पतीने उगाव येथील सरपंचास दूरध्वनी केला असता, तेथील सरपंचानी या जावयाचा भाऊ पॉझिटिव्ह निघाल्याचे सांगितले होते. तसेच हे दोघे भाऊ ठाण्यासारख्या रेड झोनमध्ये नोकरीस आहेत, असे सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जावयाच्या त्याच्या मूळ गावी पाठवावे, असे आदेश सासरच्या व्यक्तींना दिले.

त्यानंतर मेहुण्याने एक जीपमधून या कुटुंबास पिंपळगाव बसवंतला नेऊन सोडले. तेथून आल्यानंतर चालक व या मेहुण्यास क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील एकाला घरी, तर दुसऱ्यास प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आला होता. मात्र घरी क्वरंटाईन केलेली व्यक्ती गावात आली होती का? कुणाच्या संपर्कात आली होती का? त्याने त्याचे दुकान उघडले होते का, उघडले असेल, तर त्या दुकानात कोण कोण गेले? या प्रश्नांनी ग्रामस्थांचे डोके चक्रावून गेले आहे.

जावयास सासू, सासरे व तीन मेव्हुणे जेवण व पाणी देण्यासाठी शाळेत आले होते. ते होम क्वारंटाईन होते का, हे ही प्रश्न उपस्थित होत आहेत. हा जावई करोनाबाधित निघाल्याने त्याच्या संपर्कातील सहा जणांना करोना चाचणीसाठी नगरला पाठविण्यात आले आहे.

लेक व जावई पॉझिटिव्ह निघाल्याने व ते कुणा कुणाच्या संपर्कात आले, त्यांना ठाण्यावरुन येताना गावात कुणी सोडले? या विवंचनेत ग्रामस्थ आहेत. तुर्तास या सहा जणांच्या अहवालावर बरेच अवलंबून आहे. दरम्यान या सहा जणांचा रिपोर्ट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत गाव सील करण्यात आले आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गोर्डे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.