पुणे -आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक नुकतीच अटक केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये शहरातील एका पबच्या मालकासह बड्या सट्टेबाजाचा समावेश आहे. आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे दुबई, नागपूर, मुंबई या शहरात असल्याचे उघडकीस आले आहे. यातील वॉन्टेड असलेले सट्टेबाज देशाबाहेर पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोंढव्यातील एका सदनिकेत छापा टाकून खंडणी विरोधी पथकाने शनिवारी रात्री वसीम हनीफ शेख (39, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द), इक्राम मकसुद मुल्ला (26, रा. मदने सोसायटी, घोरपडे पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (35, रा. सोमवार पेठ) यांना अटक केली. याप्रकरणी जितेश मेहता (रा. पुणे) आणि अक्षय तिवारी (रा. इंदूर, मध्यप्रदेश) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जितेश मेहता हा पबमालक आहे. इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्याशी मेहताचे लागेबांधे आहेत. मेहता आणि तिवारी या दोघांचाही शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत. तांत्रिक तपासात त्यांची लिंक दुबईत आढळली आहे. पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, शंकर संपते आणि पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी शेख, मुल्ला, बाशाइब यांची मंगळवारी (23 मे)पोलीस कोठडी संपली. त्यानंतर तिघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिसांनी केली. न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. आरोपींनी सट्टेबाजासाठी तीन ई-मेल आयडीचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. इंदूरमधील सट्टेबाज तिवारी याचे बॅंक खाते गोठविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.