नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व बाबतित शहाणे आहेत. कारण, तिसऱ्या टर्ममधील पहिल्या १०० दिवसांत काय करायचे हेही त्यांनी ठरवले आहे. मात्र, यंदा भारतातील जनतेचा त्यातही खासकरून महाराष्ट्रातील जनतेचा मुड बदलला असून तो मोदीविरोधी असल्याचे मला स्पष्ट दिसत आहे. जनता भाजपला पराभूत करणाऱ्या कोणात्याही उमेदवाराला मतदान करायला तयार आहेत, असे मत राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
ते नागपुरात आयोजित एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी पवारांनी इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नावर उत्तर देताना, अद्याप यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच, सातारा व बारामतीत राष्ट्रवादीचा उमेदवार १०० टक्के निवडूण येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील जागावाटपाची स्थिती कशी असेल, असे विचारले असता पवारांनी मिश्किलपणे, मी ज्योतिषी नाही, असे उत्तर दिले. तसेच, दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्याबद्दल, पवारांनी, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्यावर अन्याय झाला. आता खरे चित्र समोर येईल, असे मत व्यक्त केले.
कच्चथिवू बेटावरूनही पलटवार
इंदिरा गांधींच्या कार्यकाळात देशातील सर्व लहान बेटे श्रीलंकेला देल्याचे मोदी काल दक्षिणेत म्हणाले. एका बाजूला पंतप्रधान मोदी हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर हल्ला करतात, तर दुसऱ्या बाजूला हजारो चौरस फुटांच्या जागा चीनला दिल्याबाबत ते एक शब्दही काढत नाहीत. देशातील राष्ट्रीय घटनांकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत, असे म्हणत शरद पवारांनी कच्चथिवू वादावरून मोदींवर पलटवार केला.
वंचित बरोबर आता गेल्यावर्षीप्रमाणे अल्पसंख्याक नेते नाहीत. त्यामुळे, यंदा गेल्यावेळसारखा निकाल येईल, असे वाटत नाही. अल्पसंख्याक समाज कोणाला विजयी करायचंय, यापेक्षा कोणाला पराभूत करायचंय, याचा जास्त विचार करतो. यंदा मात्र त्यांचा वेगळा मूड आहे. भाजपला पराभूत करु शकणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याचा लोकांचा मूड आहे.
शरद पवार, जेष्ठ नेते
सांगलीवरून मविआ पांगली!
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत पहिली ठिणगी पडण्याची शक्यता आहे. सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी आणि त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल असे या आधी सांगणाऱ्या आमदार विश्वजीत कदम यांनी आता जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहूण जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या सांगलीच्या तिढ्यावरून मविआ सध्या पांगल्याचे चित्र आहे.
फडणवीसांना टोला
महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत शरद पवार संपले, असे म्हणत होते. पण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशी परिस्थिती होती की, पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले. आताही ते आमच्याच सहकाऱ्यांसह सरकार चालवत आहेत, असे म्हणत पवारांनी देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला.