पुणे – सध्या सोने हेच सुरक्षित आणि भरवशाचे गुंतवणुकीचे माध्यम आहे. भविष्यात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याच्या शक्यतेने दसऱ्याला सोन्याला मोठी मागणी असणार आहे. या पार्श्वभूमीवर सराफा बाजारपेठ सज्ज झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के विक्री जास्त होण्याचा सराफी व्यावसायिकांचा अंदाज आहे. दागिन्यांच्या आगाऊ ऑर्डर आल्याचेही सांगण्यात येत आहे.
आधुनिक काळात समाजात अनेक बदल झाले आहेत. तरीही सुवर्ण अलंकाराची “क्रेझ’ तसूभरही कमी झालेली नाही. “गोल्ड इज गोल्ड’ म्हणत नागरिकांकडून सोने खरेदी दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: इस्रायल-गाझा युद्धानंतर सोन्याला मागणी वाढली आहे. वित्तीय संस्था, विविध बॅंका सोन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. रविवारपासूनच (दि.22) सोने खरेदीला गर्दी होणार आहे.
पूर्वी महिलांमध्ये सुवर्ण अलंकाराची “क्रेझ’ अधिक होती. मात्र, अलीकडे पुरुषांनाही सुवर्ण अलंकाराचे आकर्षण निर्माण झाले आहे. अंगावर सोने असणे प्रतिष्ठेचे मानले जाते आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी वाढत आहे, असे निरीक्षण सराफा व्यावसायिकांनी नोंदवले आहे.
“जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याला मागणी वाढली आहे. नवरात्रीच्या सुरुवातीपासून सोन्याची खरेदी जोरात सुरू आहे. विशेषत: दागिने, सोन्याची बिस्किटे, चांदी आणि हिऱ्याला जास्त मागणी आहे. दसऱ्याला रेकॉर्डब्रेक विक्री होण्याचा अंदाज आहे. लोकांनी आगाऊ बुकिंग केले आहे. 70 टक्के नागरिकांकडून दागिने, तर 30 टक्के नागरिकांकडून चोख सोने खरेदी करण्यात येत आहे.”- सौरभ गाडगीळ, पीएनजी ज्वेलर्स
“दसऱ्याला सुवर्ण खरेदीचे लोकांचे नियोजन असते. त्यामुळे मागणी चांगली राहणार आहे. आकर्षक डिझाइन्स बाजारात आहेत. खरेदीसाठी स्कीमही आहेत. त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे. अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे सोन्याच्या भावात ग्रॅममागे 100 ते 150 रुपये वाढ झाली आहे. मात्र, त्याचा खरेदीच्या उत्साहावर कोणताही परिणाम होणार नाही.”
– सिद्धार्थ शहा, चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि.