इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलनेही गाझापट्ट्यात पलटवार केला. इस्रायल-हमास या युद्धामुळे मात्र जगात चिंतेचे वातावरण आहे. या युद्ध लावण्यामागे हमासचा दहशतवादी मोहंमद दीफ याचा चेहरा लपलेला आहे. मात्र मोहंमद दीफला आजघडीला कधीही सार्वजनिकरित्या वावरताना पाहिले नाही. त्याचा आवाजदेखील खूप कमी ऐकू येतो. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या टीव्ही चॅनेलवर दीफ बोलणार असल्याची घोषणा झाली, तेव्हाच पॅलेस्टिनी नागरिकांना काहीतरी गडबड होणार असल्याची कुणकुण लागली होती आणि नंतर जे घडले ते जगाने पाहिले.
गाझापट्टीवरून इस्रायलवर हजारो रॉकेट सोडले जात होते, तेव्हा हमासचा दहशतवादी मोहंमद दीफच्या एका ऑडियो टेपचे प्रसारण सुरू होते. इस्रायलचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी असणाऱ्या मोहंमद दीफने त्या टेपमध्ये “अल अक्सा फ्लड’ नावाने एक संकेत दिला आणि हा हल्ला जेरुसेलमच्या अल अक्सा मशिदीवरील केलेल्या कारवाईचा बदला आहे, असे सांगितले. पवित्र ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल अक्सावर मे 2021 मध्ये इस्रायलने केलेल्या कारवाईने अरब जगाची नाराजी ओढवून घेतली होती. तेव्हाच दीफने हल्ल्याची योजना आखण्यास सुरुवात केली होती, असे म्हटले जात आहे.
प्रत्यक्षात धर्म आणि सार्वभौमत्त्वाच्या नावावर सुरू असलेल्या हिंसाचारात जेरुसेलम हे केंद्रस्थानी राहिले आहे. तेथे इस्रायलच्या कारवाईनंतर इस्रायल आणि हमास यांच्यात 11 दिवस युद्ध चालले. इस्रायलच्या सात हल्ल्यांत बालंबाल बचावलेल्या मोहंमद दीफला आजघडीला कधीही सार्वजनिकरित्या वावरताना पाहिले नाही. त्याचा आवाज देखील खूप कमी ऐकू येतो. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या टीव्ही चॅनेलवर दीफ बोलणार असल्याची घोषणा झाली, तेव्हाच पॅलेस्टिनी नागरिकांना काहीतरी गडबड होणार असल्याची कुणकुण लागली. टीव्हीवर प्रसारित झालेल्यां टेपमध्ये दीफ म्हणाला, “अल अक्सावरील हल्ल्यांमुळे निर्माण झालेला संताप आणि राग हा लोकांच्या मनात आणि देशात खदखदत आहे. आमच्या लोकांनो, या गुन्हेगारांना “तुमचा काळ आता संपला आहे’ हे सांगण्याचा दिवस आला आहे.’
केवळ तीन फोटो
मोहंमद दीफ याचे केवळ तीनच फोटो आहेत. त्याचा एक खूप तरुण वयातला म्हणजे 20 वर्षांचा असतानाचा आहे. दुसऱ्या छायाचित्रात त्याच्या चेहऱ्यावर मास्क आहे आणि तिसऱ्या फोटोत केवळ त्याची सावली आहे. हे फोटो ऑडिओ टेपच्या प्रसारणाच्या वेळी दाखविली गेले. दीफ कोठे आहे, याचा थांगपत्ता कोणालाही नाही. अर्थात गाझा भागातल्या भुयारातील नेटवर्कमध्ये तो असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे म्हटले जाते, हल्ला करण्याचा निर्णय हा दीफ आणि याह्य सिनवार यांनी घेतला. दीफ हा हमासच्या अल कासीम ब्रिगेडचा प्रमुख आहे, तर सिनवार हा गाझात हमासचा नेता आहे. अर्थात हल्ल्याचा संपूर्ण मास्टरमाइंड हा एकच होता. या मोहिमेची माहिती हमासमधील काही मूठभर लोकांनाच होती.
इराणची मदत
हल्ल्याची गोपनीयता एवढी होती की, इस्रायलने घोषित केलेला शत्रू आणि हमाससाठी पैसे देणारा, प्रशिक्षण देणारा, शस्त्रांचा प्रमुख स्रोत असणाऱ्या इराणलादेखील या हल्ल्याची माहिती नव्हती. मात्र हमास हा एक मोठी मोहीम आखण्याची तयारी करत आहे, हे इराणला ठाऊक होते. या हल्ल्यात इराणचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. हमास, पॅलेस्टिनी नेतृत्व, इराणसमर्थक लेबनॉन कट्टरपंथीय गट हिजबुल्लाह आणि इराणच्या एकत्र बैठकीत देखील या हल्ल्याबाबत चर्चा झाली नव्हती. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी 10 ऑक्टोबर रोजी म्हटले की, आपला देश इस्रायलवरील हल्ल्यात सहभागी नाही. एका अर्थाने दीफने योजना गुप्त ठेवण्यासाठी बरीच तयारी केली होती. इस्रायलला देखील गाफील ठेवले आणि हमास आता हल्ला करण्याच्या मूडमध्ये नाही, असे भासविले गेले.
याउलट गाझाचा आर्थिक विकास करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे हमासच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. अनेकदा तर हे काम इस्रायल सैनिकांदेखत झाले होते. हमासच्या परराष्ट्र संबंधाचे प्रमुख अली बराका याने म्हटले की, या हल्ल्यांसाठी हमासच्या दहशतवाद्यांनी दोन वर्ष तयारी केली. टीव्हीवरील प्रसारित टेपमध्ये दीफने म्हटले, की हमासने अनेकदा इस्रायलला पॅलेस्टिनी नागरिकांविरुद्धची कारवाई थांबवणे, कैद्यांना सोडून देण्याचे आवाहन केले होते. अत्याचार केले जात होते. पॅलेस्टिनी जमीन ताब्यात घेण्याचे थांबवावे, असेही आवाहन केले होते. दीफने म्हटले की, दरोज ताब्यात घेतल्या जाणाऱ्या गावांत स्फोटांचे आवाज ऐकू येतात. पश्चिम किनारपट्टीवर सुमारे एक वर्षांपासून अशांतता आहे. शंभर किलोमीटर लांब आणि 60 किलोमीटर रुंद असलेल्या या भागावर इस्राईलने ताबा घेतला आणि तेव्हापासून संघर्ष सुरू आहे.
मोहंमद मासरीचा बनला मोहंमद दीफ
1965 मध्ये गाझाच्या खान यूनिस येथील निर्वासितांच्या छावणीत मोहंमद मासरीच्या रुपातून दीफचा जन्म झाला. ही छावणी 1948 नंतर अरब इस्रायल संघर्षानंतर निर्वासितांसाठी उभारण्यात आली होती. 1987 रोजी पॅलेस्टिनीचे पहिले बंड सुरू झाले आणि यादरम्यान हमासशी संपर्कात आल्यानंतर त्याला मोहंमद दीफ म्हटले गेले. त्याने गाझाच्या इस्लामिक यूनिर्व्हसिटीत विज्ञानात पदवी प्राप्त केलेली. विद्यापीठात त्याने भौतिक, रसायन आणि जैवविज्ञानाचा अभ्यासही केला. यूनिर्व्हसिटीच्या एन्टरटेनमेंट कमिटीचा प्रमुख म्हणूनही त्याने कलेतही आवड दाखविली आणि व्यासपीठावर कॉमेडियनच्या रुपातून कलाही सादर केली.
हमासला पुढे नेण्याबराबेरच दीफने भुसुरंगाचे नेटवर्क तयार करण्याचे काम केले आणि बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षणही घेतले. आत्मघाती बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून डझनभर इस्रायल नागरिकांच्या हत्येला त्यालाच जबाबदार मानले जाते. दीफसाठी लपणे हा त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. इस्रायलने त्याला मारण्यासाठी सात वेळेस प्रयत्न केले मात्र तो वाचला. एका हल्ल्यात त्याने डोळा गमावला आणि पायाला मारही लागला. 2014 च्या इस्राईल हल्ल्यात त्याची पत्नी, सात महिन्यांचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. हमासच्या सशस्त्र गटाचे नेतृत्व करताना त्याने आपल्यासाठी पॅलेस्टिनी लोकनायकाचा दर्जा मिळवला.
व्हिडिओत तो मास्क घातलेला दिसतो आणि त्यानंतर त्याची सावली दिसते. दीफला मारण्याचा सर्वात अलीकडचा प्रयत्न मे 2021 मध्ये “ऑपरेशन गार्झियन ऑफ द वॉल्स’दरम्यान झाला. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 8 सप्टेंबर 2015 रोजी दीफला जागतिक दहशतवाद्याच्या यादीत सामील केले आहे. अनेक जण दीफला पॅलेस्टिनी आणि इस्रायल लोकांत शांतता प्रस्थापित करण्यातला मोठा अडथळा मानतात. 2014 च्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गाझा-इस्रायल युद्धाच्या काळात शस्त्रसंधी असतानाही हल्ले होण्यास दीफला जबाबदार मानण्यात येते.
अल जहरचा इशारा
हमासचा टॉप कमांडर मेहमूद अल जहरचा एक व्हिडिओ जारी झाला आहे. त्यात तो म्हणतो, की हमास केवळ पॅलेस्टिनीच नाही तर संपूर्ण जगाला स्वातंत्र्य मिळवून देईल. संपूर्ण पृथ्वीवर आपल्या कायद्याप्रमाणे राज्य असेल या ठिकाणी कोणीही यहुदी आणि ख्रिश्चन नसेल. यापूर्वीदेखील अल जहरने डिसेंबर 2022 मध्ये व्हिडिओ जारी केला होता. आता पुन्हा व्हिडिओ आल्याने आगामी काळात हमास किंवा इराणशी संबंधित अन्य दहशतवादी संघटना जगभरातील यहुदी आणि इस्रायलच्या ठिकाणांवर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखू शकतात, असा धोका वर्तविला जात आहे.
इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संघटनेने परदेशातील यहुदी नागरिकांना सजग राहण्याचा इशारा दिला आहे. मोसादने एक्सवर ट्विट करताना म्हटले की, हमास आणि गाझा तसेच अन्य ठिकाणाहून दहशतवादी संघटना या इस्रायलवर रॉकेट सोडत आहेत. काहींनी घुसखोरी केली आहे. इस्रायलबाहेरही यहुदींवर हल्ले होऊ शकतात. सुरक्षित राहा. 9 ऑक्टोबरच्या रात्री उत्तर लंडनच्या उपनगर गोल्डर्स ग्रीन येथे इस्रायलच्या पारंपरिक रेस्टॉरंटची मोडतोड करण्यात आली. तेथून जवळच असलेल्या पुलावर “फ्री पॅलेस्टाइन फ्री’ असे लिहिले होते. हमासच्या हल्ल्यानंतर यहुदी शाळा आणि यहुदीबहुल भागात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
अल जहर कोण आहे?
78 वर्षीय महंमद अल जहर हा एक पॅलेस्टिनी नेता आहे, तो हमासचा सह संस्थापक आणि गाझा पट्टीतील हमासचा प्रमुख सदस्य आहे. त्याने 2006 मध्ये हमासप्रभुत्वाखाली स्थापन झालेल्या पॅलेस्टिनी प्राधिकरण सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आहे. तो गाझा येथील इस्लामिक विद्यापीठाच्या प्राथमिक संस्थापकापैकी एक मानला जातो. अल जहरचे चार मुले असून त्यापैकी दोन मारली गेली. 10 सप्टेंबर 2003 रोजी त्याचा सर्वात मोठा मुलगा खालिदचा इस्राईलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. त्याचा दुसरा मुलगा हमासची सैन्य शाखा इज्ज अद दीन अल कसम ब्रिगेडचा सदस्य होता. तो 15 जानेवारी 2008 रोजी गाझात इस्रायलच्या गोळीबारात मारला गेला.
– श्रीकांत देवळे