- घाटावरील कृत्रिम हौदात विसर्जन
पिंपरी, दि. 28 – गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांचा जयघोष करत पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घालत गणरायाला आज (गुरूवार) मोठ्या उत्साहात निरोप दिला जात आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीत विसर्जनासाठी यंदाही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाचे कृत्रिम हौदातच विसर्जन करत आहेत. दुसरीकडे पोलिसांचा घाटावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चिंचवडमध्ये दुपारी साडेचार वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवतेज मित्र मंडळ साडेचार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाले. सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विर्सजन संथगतीने होत असतानाच घरगुती बाप्पाचे विसर्जन नागरिक करत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पवना आणि इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी पात्रात कोणालाही विसर्जन करू दिले जात नाही. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 28 घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन केले जात आहे. तसेच मूर्तीदान उपक्रमाला गणेश भक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
चिंचवड चापेकर चौकात मिरवणुक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. चौकातच महापालिका आणि पोलिसांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे.