- लॉकडाऊनचा परिणाम ः सार्वजनिक वाहतूक सुरू नसल्याचे नुकसान
पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या “पीएमपी’ला वर्षातील काही सण मोठे उत्पन्न मिळवून देतात. त्यापैकी रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी या दिवशी “पीएमपी’ सरासरी पाच कोटींचे उत्पन्न मिळविते. परंतु यावर्षी अन्य सणांप्रमाणे हा सण देखील “करोना’मुळे नेहमीप्रमाणे साजरा झाला नाही.
लॉकडाऊनचे नियम शिथील केले असले, तरीदेखील सार्वजनिक वाहतूक सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे दरवर्षी हमखास उत्पन्नवाढ देणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशीही पीएमपीची तिजोरी रिकामीच राहिली. पीएमपीला यंदा जवळपास पाच कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक चाक आणखी गाळात रुतत आहे.
बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आर्थिकदृष्टया मोठा आधार असतो. पीएमपीच्या वतीने रक्षाबंधनापूर्वीचा आणि नंतरचा तसेच रक्षाबंधन असे एकूण तीन दिवस उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित केले जाते. त्याकरिता अनेक मार्गांवर जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात असायचे. मात्र, यंदा केवळ आवश्यक सेवांकरिता पीएमपी बस रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. केवळ आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे भावाला राखी बांधण्याच्या बहिणींच्या स्वप्नाला करोनामुळे छेद मिळाला आहे.
गेली सलग तीन वर्षे उत्पन्नाचे रेकॉर्ड रचणाऱ्या पीमएपी प्रशासनाने रक्षाबंधनकाळातील उत्पन्नाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार आतापर्यंत रक्षाबंधनानिमित्त सरासरी पावणे पाच कोटींचे उत्पन्न पीमएपीला मिळाले आहे. यंदा मात्र, बस मार्गांवरच धावू न शकल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका पीएमपीला बसला आहे.
खर्चही वाढणार
लॉकडाऊनमुळे सर्व बस जकातनाक्यांच्या मोकळ्या जागांवर उभ्या करुन ठेवल्या आहेत. चार महिन्यांपासून बस धावू न शकल्याने या सर्व बसच्या बॅटऱ्या नादुरुस्त झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या बसच्या देखभालदुरुस्तीचा खर्च वाढणार आहे. उत्पन्नाला मर्यादा आल्याने पीमएपीने बीआरटी मार्गांवरील बसथांब्यांच्या सुरक्षेकरिता नेमलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांना घरचा रस्ता दाखविला आहे. तर कायमस्वरुपी सेवेत असलेल्या चालक व वाहकांना या बसथांब्यांच्या रखवालीचे काम सोपविले आहे. तर आवश्यकतेनुसार दोन्ही महापालिकांच्या विविध सेवांमध्ये नियुक्त्या दिल्या आहेत.
खासगी वाहनांचा प्रवासाकरिता वापर
बहुतांशी बहिणींना आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आपल्या माहेरी जायचे होते. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच ठप्प राहिल्याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधत रक्षाबंधन साजरे केले. मात्र, प्रवासाच्यादृष्टीने जवळ असलेल्या बहिणींनी खासगी वाहनांचा वापर करत, माहेरी जाऊन भावाला राखी बांधून ओवाळले.