किव्ह : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आता तब्बल दोन महिने उलटून गेले आहेत. या युद्धात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. मात्र असे असले तरी या युद्धामध्ये एका कुत्र्याची चर्चा अख्या जगभरात होत आहे. युक्रेनच्या या साहसी लष्करी कुत्र्यामुळे इथल्या लष्कराला मोठी मदत झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे. एवढंच नाही तर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून या कुत्र्याचे आभार मानले आहेत.
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरवर ‘पॅट्रॉन’ नावाच्या सर्व्हिस डॉगचे जाहीर आभार मानले आहेत. १५० हून अधिक स्फोटके शोधल्याचा दावा ट्विटर पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ‘पॅट्रॉन’ या सर्व्हिस डॉगने चेर्निहाइव्ह या युक्रेनियन शहराजवळ स्फोटक उपकरणे शोधून ते निकामी करण्याऱ्या टीमसोबत जवळून काम केले आहे. “पॅट्रॉन हा चेर्निहाइव्हमधील सर्व्हिस डॉग आहे.
Patron is a service dog in #Chernihiv. He has discovered over 150 explosive devices in #Ukraine since full scale #Russian invasion began. Patron works closely with deminers to make #Ukrainian cities safe again.
Thank you so much for your service!
📸 by patron_dsns (Instagram) pic.twitter.com/VyFbk2ffLQ
— MFA of Ukraine 🇺🇦 (@MFA_Ukraine) April 24, 2022
रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून त्याने युक्रेनमध्ये १५० हून अधिक स्फोटकं शोधली आहेत. युक्रेनियन शहरे पुन्हा सुरक्षित करण्यासाठी डेमिनर्ससोबत काम करत आहे. तुमच्या सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद!”, असे ट्वीट परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
@patron_dsns या इन्स्टाग्राम हँडलखाली पेट्रॉनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओंमध्ये तो कर्तव्य बजावताना दिसत आहे. पेट्रॉन दोन वर्षांचा असून तो जॅक रसेल टेरियर जातीचा कुत्रा आहे. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवा (एसईएस) च्या चेर्निहाइव्ह शाखेचा सदस्य असून युक्रेन तसेच जगभरात प्रसिद्ध झाला आहे.