नगर – चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून 20 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तर एकाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. बोल्हेगाव परिसरातील निंबळक रस्त्यावरील अरुणोदय सिटीमध्ये गुरुवारी (दि. 12) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत गोरक्षनाथ कानडे (वय- 29 रा. बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी कानडे यांच्या अरुणोदय सिटीमध्ये असलेल्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कानडे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून दोन हजार रूपयांची रोकड, एक मोबाईल असा तीन हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी कानडे यांच्या घराशेजारी असलेल्या राजु मल्हारी गुंजाळ, अनिल महादु गायकवाड यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चार हजारांची रोकड, दोन मोबाईल व 10 हजारांचे सोन्याची दागिने असा ऐवज लंपास केला. तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.