सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हत्यारबंद चोरटे कैद
मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथील नितीन खुडे यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न पाच चोरट्यांनी सोमवारी (दि. 7) पहाटे केला. हा सर्व प्रकार खुडे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चोरट्यांकडे कोयते, कुऱ्हाडी, लोखंडी सळई अशी हत्यारे होती. पाच चोरट्यांनी हाफ शर्ट, हाफ पॅंट, अंगावर घोंगडी गुंडाळल्या होत्या. चोरट्यांनी खुडे यांच्या दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खुडे यांच्या पत्नी अर्चना यांना लोखंडाचा आवाज आल्याने त्यांनी बाहेरील लाईट सुरू केला. प्रथम दोन चोरट्यांनी शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना शटर उचकटता न आल्याने आणखी एक चोरटा त्यांच्याजवळ आला. त्यांच्याकडे कोयते, सळई इत्यादी हत्यारे होती. त्यानंतर आणखी तीन चोरटे त्यांच्याजवळ आले. त्यापैकी एक चोरटा दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीकडे पाहत होता. त्यावेळी अर्चना खुडे खिडकीतून ओरडल्या आणि कोण आहे येऊ का खाली, असे म्हटल्यावर चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरट्यांनी देवीचे मंदिर तसेच घरे फोडण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.