पुणे – जिल्हासह नवी मुंबई परिसरातून चारचाकी वाहने चोरणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणून १६ लाख ५० हजारांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये दोन ट्रॅक्टर, दोन छोटे टॅम्पो, दुचाकीचा समावेश आहे. अमोल प्रभू माळी (वय २४ रा.नायरवस्ती, वाडेबोल्हाई ता.हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सराईत दुचाकीचोर फुरसुंगी चौकातील प्रकृती हॉटेल हडपसर येथे दुचाकीने येणार आहे अशी माहिती गणेश लोखंडे आणि अमोल सरतापे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अमोल माळी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले.
अधिक चौकशीत त्याने नवी मुंबईतील उरण परिसरातून दोन टेम्पो आणि बारामती व वडगाव निंबाळकर येथून दोन ट्रॅक्टर चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलrस उानिरीक्षक गुंगा जगताप, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, शकिर खान, मनोज शिंदे, दत्तात्रय खरपुडे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, अमोल सरतापे यांनी केली.