मुंबई : राज्य शासनाचा 2021 सालचा ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
सुमधुर स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका @ashabhosle यांना नुकताच #महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने आज त्यांचे निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले.पुरस्कार स्वीकारल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने आभार मानले.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks pic.twitter.com/jBSUwMKugg
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) July 29, 2021
‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत श्रीमती आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांचे आभारी आहोत. पण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते, असे श्रीमती आशा भोसले यांनी सांगितले.
या पुरस्कारासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे. सध्या राज्यात कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही. तर गेल्या आठवड्यात चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झाले आहे. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सन्मानसोहळा आयोजित करावा अशी विनंतीही त्यांनी केली.