मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांचा थेट सवाल; म्हणाले, ‘तुम्ही काय…’

मुंबई – राज्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसामुळे यंदाही कोकणात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवला. मात्र संकटात सापडलेल्या कोकणवासीयांच्या मदतीसाठी आयोजित पाहणी दौरे एकमेकांवरील राजकीय चिखलफेकीमुळेच जास्त चर्चिले गेले. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यामध्ये उडी घेत मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिल.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून “सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा,” अशा भाषेत सुनावले होते. राणेंचा याच वक्तव्याला आता अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं.

याबाबत बोलताना अजित पवार यांनी, “काही नेते मंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले, पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहेत?, तहसीलदार कुठे आहेत? याची विचारणा करत बसलो नाही. पण काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती”

“यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशाप्रकारची भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही. तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलात की मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी करायला आलात? अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का?” असा सवाल उपस्थित केला.   

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.