नगर – जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे मागील वर्षात कडबाकुट्टींचे वाटप केले होते. यामध्ये संगमनेर तालुक्याला सर्वाधिक झुकते माप देण्यात आल्याचा आरोप केला जात असून, संगमनेर तालुक्यात जनावरांची संख्या अधिक असल्यामुळेच त्यांना झुकते माप देण्यात आल्याची टिप्पणी केली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता, जिल्ह्यात गायी व म्हशींची संख्या 16 लाख 48 हजार 548 असून, त्यामध्ये पाच लाख 91 हजार 663 दुभती जनावरे आहेत. जिल्ह्यात दैनंदिन 25 लाख 35 हजार 94 लिटर दूधसंकलन होत आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यात चार लाख 74 हजार 707 लिटर दुधाचे संकलन होत असल्याचे समोर आले. जिल्ह्यात गाय वर्गाची 14 लाख 27 हजार 185, तर म्हैस वर्गाची संख्या दोन लाख 2 हजार 363 आहे. दुभत्या गायींमध्ये संकरित गायींची संख्या चार लाख 67 हजार 751 असून, देशी गायींची संख्या 96 हजार 513 आहे.