उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांची माहिती
वाघोली : वाघोली परिसरामध्ये आगामी काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे खबरदाची उपाय म्हणून नागरिकांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने वाघोलीसह भावडी, आव्हाळवाडी, केसनंद ग्रामपंचायतीचा परिसर गुरुवारी मध्यरात्री १२ वाजलेपासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात येत असल्याची माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर सचिन बारवकर यांनी आदेशान्वये दिली आहे.
साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ मधील तरतुदी व तहसिलदार हवेली यांच्या अहवालानुसार वाघोली, आव्हाळवाडी, भावडी, केसनंद या ग्रामपंचायतीचा परिसर कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मध्यरात्री १२ वाजलेपासून सील करण्यात येणार आहे. संबंधित पोलीस स्टेशन प्रमुखांनी परिसर सील करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सील करण्यात आलेल्या भागात नागरिकांना प्रवेशबंदी व त्याभागातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कामाकरीता घराबाहेर पडताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तथापी सील करण्यात आलेल्या भागात लावण्यात आलेल्या निर्बंधातून कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहार व तेथील मालाची आवक-जावक, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने काम करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.