लाहोर – पाकिस्तानच्या लष्कराने आपल्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली 10 वर्षे तुरुंगात टाकण्याची तयारी केली होती, असा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. कॉर्प्स कमांडरमधील जाळपोळ आणि त्यांच्या अटकेनंतर भडकलेल्या अन्य हिंसक आंदोलनांशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी इम्रान खान लाहोर उच्च न्यायालयात हजर होणार आहेत.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खान यांना जामीन मंजूर केला आहे. अन्य सर्व प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना अटक करण्यास प्रशासनाला न्यायालयाने अटकाव केला आहे.
याच दरम्यान इम्रान खान यांनी आपल्या निवासस्थानी “पीटीआय’च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि लष्कराविरोधात ट्विट करून नव्याने आरोप केले आहेत. आपल्याबरोबर पत्नी बुशरा यांनाही तुरुंगात टाकण्याचा कट लष्कराने केल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
पाकिस्तानात खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होण्यासाठी “हक की आझादी’ आणण्यासाठी रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत संघर्ष करण्याती आपली तयारी आहे. पाकिस्तानातील जनतेनेही या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील इम्रान खान यांनी केले आहे.