येरवडा – करोना काळात बंद असलेली उद्याने सुरू झालेली असली तरी उद्यानात चिमुकल्यांसाठी असलेली खेळणी मात्र बंद तसेच मोडतोड झालेल्या अवस्थेत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. निधीच मिळाला नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. उन्हाळी सुट्टीत उद्यानात खेळण्यासाठी बालकांची गर्दी होत असताना पालिकेकडून दुरुस्तीची कामे केली गेली नसल्याने बालकांचा हिरमूस होत आहे, सुट्टी असतानाही उद्यानातील खेळांचा आनंद घेता येत नसल्याने बालके नाराज राहत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. येरवडा येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बुलेट ट्रेन, म्युझिकल कांरजे आणि सेव्हन-डी थिएटर बंद आहे. यामुळे लहान मुले नाराज होत आहे.
वडगाव शेरी गावामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सात एकर क्षेत्रात उभारण्यात आले आहे. यामध्ये बुलेट ट्रेन, म्युजिकल कारंजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑक्युपेशन ट्रक, ओपन जीम, ऑक्सिजन कॉर्नर आणि लहान बालकांसाठी विविध खेळणी आहेत. शहरातील इतर भागातील हजारो नागरिकही या उद्यानाला भेट देतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उद्यानातील सर्वच खेळणी बंद आहेत. उद्यानाचे आकर्षण असलेल्या सेवा बंद असल्याने. नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ज्या गरीब नागरिकांना वॉटर पार्कमध्ये जाणे परवडत नाही, त्यासाठी पालिकेच्या उद्यानात असलेली खेळणी सोयीची असतात. मात्र, ती बंद असल्याने मुलांसह पालकांचाही हिरमोड होत आहे.
राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानावर कोट्यवधी रुपये खर्च करून सुविधा दिल्या आहेत. मात्र, त्या धूळखात पडून असल्याने त्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. या सुविधांचा नागरिकांना लाभ घेता येत नसेल, तर करोडो रुपयांच्या निधीचा खर्च कोणासाठी केला.
– उद्धव गलांडे, अध्यक्ष, शवकर्म प्रतिष्ठान
सेव्हन-डी थिएटर सुरू आहे. बुलेट ट्रेनचे काम व्हेकल डेपोकडे असल्याने त्याबाबत सांगता येणार नाही. कारंजे सुरू आहे. लेझर-शो लायसन्स कॉपी संपल्याने ते बंद आहे. कारंज्याच्या येथे अनेक कामे करायची आहेत. निधी उपलब्ध नसल्याने काम करता येत नाही.
– योगेश माळी, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग
सध्या, शहरातील पाच उद्यानातील कामे सुरू असून, कोविडमुळे निधी उपलब्ध झाला नव्हता. दोन वर्षांपासून बंद असल्याने मेन्टेन्सचे काम करायचे आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत बुलेट ट्रेन सुरू करण्यात येईल.
– डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त, मोटर वाहन विभाग