वाघळवाडी -सोमेश्वर कारखान्याने ऊस दर गुणवत्तेवर दिला असून कोणाच्याही दराची वाट न पाहता सोमेश्वरने हा दर सभासदांना दिला आहे. यात बारामती तालुक्यासह अन्य कोणत्याही कारखान्यांशी ऊसदरासाठी स्पर्धा करण्याचा कोणताही हेतू नाही. तसेच, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना 3400 रुपये प्रति मे. टन दिलेला ऊसदर हा गेटकेनच्या मेहरबानीवर दिला गेल्याचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याने 2018-19 गळीत हंगामकरिता 3300 रुपये दर जाहीर केल्यानंतर माळेगावनेही सभासदांकरिता 3400 रुपये दराची घोषणा केली, असे असताना माळेगावने गाळप हंगाम 2018-19 मध्ये गेटकेन ऊस उत्पादकांना प्रतिटन 2850 रुपये दर दिला असून सभासदांपेक्षा तब्बल 550 रुपये गेटकेनला कमी दिलेला आहे म्हणजेच गेटकेन ऊस उत्पादकांना जवळपास 20 कोटी रुपये कमी मिळालेले आहेत.
याचाच फायदा माळेगावला सभासदांनी अधिकचे 275 रुपये प्रतिटन देण्यात झाला आहे. गाळप हंगाम 2018-19 मध्ये माळेगावने सभासदांच्या 7,14,000 मे.टन उसाचे गाळप केले आणि याच हंगामात सोमेश्वरने 10,04,000 मे.टन सभासदांच्या उसाचे गाळप केले याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.