मेट्रोची खोदाई मशीन तयार

महिनाअखेरीस पुण्याकडे होणार रवाना 
पुणे – पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या खोदाईचे मशीन (टनेल बोअरिंग मशीन) अखेर तयार झाले आहे. चीनमधील टेराटेक या कंपनीने हे मशीन तयार केले असून त्याची प्रायोगिक चाचणी शुक्रवारी झाली. महामेट्रोच्या अधिकाऱ्यासमोर ही चाचणी घेण्यात आली असून ही मशीन या महिना अखेरीस भारताकडे रवाना होणार आहे. तर पुढील महिन्यात दाखल होऊन नोव्हेंबर महिन्यात मशीनद्वारे प्रत्यक्ष खोदाई सुरू होणार आहे.

स्वारगेट ते शिवाजीनगर हा 5 किलोमीटरचा भुयारी मार्ग असणार आहे. या मार्गासाठी दोन स्वतंत्र बोगदे असणार असून दोन मशीनद्वारे एकाच वेळी या मार्गांची खोदाई केली जाणार आहे. त्यासाठी खोदाई मशीन तयार करण्याचे काम चीनमधील टेराटेक कंपनीस देण्यात आले असून त्यातील पहिले मशीन तयार झाले आहे.

या मशीनची चाचणीही यशस्वी झाल्याने या महिना अखेरीस या मशीन भारतात येण्यासाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, या खोदाईसाठी महामेट्रोकडून रेंजहिल्स तसेच स्वारगेट येथे शाफ्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम पुढील 2 महिन्यांत पूर्ण होणार असून या मशीनने खोदाई केल्यानंतर बोगद्यात बसविण्यात येणाऱ्या कॉंक्रिट रिंगचे कामही पुण्यात वेगाने सुरू आहे. दरम्यान, महामेट्रोने भुयारी मेट्रोच्या खोदाईसाठी नियोजित केलेले काम वेळत पूर्ण होणे शक्‍य असून त्यासाठी निश्‍चित केलेल्या मुदतीत हे मशीन तयार झाले असल्याने मेट्रो प्रकल्पासाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.