2019 मध्ये आगीची एकही घटना नाही

पीएमपीएमएल प्रशासनाचा दावा : गतवर्षी 13 बसेसने घेतला होता पेट 
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसना आग लागण्याचे प्रमाण गेल्या वर्षभरात वाढले होते. मात्र, 2019 मध्ये एकाही बसला आग लागली नसल्याचा दावा पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पीएमपीएमएलच्या बसेसना अचानक आग लागण्याचे प्रमाण वाढले होते. यामध्ये मनुष्यहानी टळली असली तरी पीएमपीएमएलचे नुकसान झाले होते. मागील वर्षी सुमारे 13 बसेसने पेट घेतल्याची पीएमपीएमएलकडे नोंद आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून जानेवारी 2019 मध्ये फायर ऑडीट समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीकडून काही निष्कर्ष नोंदविण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याने 2019 मध्ये बसेसना लागणाऱ्या आगीची दुर्घटना घडली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे 1,900 बसेस आहेत. यात पीएमपीच्या मालकीच्या 811 डिझेल आणि 551 सीएनजी तर कंत्राटी मालकी असणाऱ्या 577 सीएनजी आणि 25 ई-बस आहेत. यासह डिसेंबर अखेरपर्यंत 940 बस लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत.

मागील वर्षीप्रमाणे पुन्हा पीएमपी बसेसना आग लागू नये, यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. यात एआरएआय, सीआयआरटी, आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय), टाटा मोटर्स, अशोक लेलॅन्ड, फायर ऑडीट कन्सल्टंट, अँथनी गॅरेज, महालक्ष्मी ऑटोमोटीव्ह, पीएमपीचे दोन मुख्य अभियंता, भांडार अधिकारी आणि मेंटेनन्स इंजिनिअर यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.