‘वाढीव’ गुणांचा फुगा फुटला

दहावीचा निकाल यंदा 12.31 टक्‍क्‍यांनी घटला
ऑनलाईन निकाल जाहीर : राज्याचा 77.10 टक्के निकाल
– कोकण आघाडीवर, तर नागपूर पिछाडीवर
– मुलींचा निकाल मुलांपेक्षा 10.64 टक्‍क्‍यांनी जास्त
– दिव्यांगाचा निकाल 83.05 टक्के
– 10 विषयांचा निकाल 100 टक्के
– 1 हजार 794 शाळांचा निकाल 100 टक्के
– पुनर्परिक्षार्थींचा निकाल 32.32 टक्के

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 77.10 टक्के लागला असून गत वर्षाच्या तुलनेत यंदा 12.31 टक्‍क्‍याने निकाल घटला आहे. परीक्षेचा पॅटर्न यंदा बदलल्याने वाढीव गुणांना चाप बसला असून मागील काही वर्षांतील यंदा नीचांक ठरला आहे. दरम्यान, यंदा मुलींचा निकाल 82.82 टक्के तर मुलींचा निकाल हा 72.18 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 10.64 टक्‍क्‍याने जास्त लागला असून यंदाही मुलींच अव्वल ठरल्या आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 88.38 टक्के एवढा लागला असून सर्वात कमी निकाल नागपूरचा 72.18 टक्के लागला आहे.

राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे व सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याला निकाल जाहीर केला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 11 ते 28 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत झाल्या आहेत. राज्यातील नऊ विभागात 16 लाख 39 हजार 862 विद्यार्थ्यांची परीक्षा अर्जांची नोंदणी केली होती. त्यातील 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील 12 लाख 47 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी राज्याचा एकूण निकाल 89.41 टक्के एवढा लागला होता. यंदा तो 77.10 टक्के लागला आहे.

राज्यातील 8 लाख 84 हजार 130 मुलांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. यातील 8 लाख 70 हजार 887 मुले प्रविष्ट झाले होते. त्यातील 6 लाख 28 हजार 644 मुले उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 7 लाख 55 हजार मुलींनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यातील 7 लाख 47 हजार 715 मुली प्रविष्ट झाल्या. त्यातील 6 लाख 19 हजार 259 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

कला व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या एकूण 1 लाख 36 हजार 979 विद्यार्थ्यांना सवलतींच्या वाढीव गुणांचा लाभ मिळाला आहे. राज्यातील 22 हजार 246 शाळांमधून विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 1 हजार 794 शाळांना निकाल 100 टक्के लागला आहे. एकूण 71 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यातील 19 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दिव्यांगाचा निकाल 83.05 टक्के लागला आहे. पुनर्परिक्षार्थींचा निकाल 32.32 टक्के लागला आहे. खासगीरित्या प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 30 हजार 861 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 34.76 इतकी आहे.

टेबल तयार करणे –

राज्यातील विभागनिहाय निकालाची टक्केवारी –
विभाग – पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण
निकालाची टक्केवारी – 82.48, 67.27, 75.20, 77.04, 86.58, 71.98, 77.58, 72.78, 88.38

यंदा 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यात केवळ 20 विद्यार्थ्यांनाच 100 टक्के गुण मिळविता आले आहे. यात लातूर विभागातील 16 विद्यार्थ्यांचा समावेश असून हा विभाग अव्वल ठरला आहे. औरंगाबादमधील 3 व अमरावतीतील 1 विद्यार्थीही यशस्वी ठरला आहे. उर्वरित पुणे विभागासह इतर विभागातील एकाही विद्यार्थ्याला 100 टक्के गुण मिळविता आले नाहीत. गेल्या वर्षी राज्यातील 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळविले होते. यंदा ही संख्या खूपच घटली आहे.

नवीन अभ्यासक्रम, पॅटर्नमुळे टक्का घटला
दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून यंदा त्यानुसारच परीक्षा झाली. पेपर पॅटर्नही बदलण्यात आला आहे. कृतिपत्रिकांचा वापर करण्यात आला. त्याबरोबरच काही विषयांच्या तोंडी परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विविध कारणांमुळे यंदा दहावीचा निकाल घटल्याची माहिती राज्यमंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.