नागरिकांनी मांडले गाऱ्हाणे : कार्यालयाला सुप्रिया सुळे यांनी दिली भेट
बारामती – गहाळ झालेले पासपोर्ट नव्याने मिळवण्यासाठी बारामती पासपोर्ट कार्यालयात कोणतीही सुविधा नसल्याने पुण्यालाच जावे लागते. मात्र, पुण्याला आधीच गर्दी असल्याने बारामतीकरांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे गाऱ्हाणे नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडले.
बारामती येथील पासपोर्ट कार्यालयास खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. 17) भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतली, यावेळी नागरिकांनी आपल्या अडीअडचणी खासदार सुळे यांच्यापुढे मांडल्या. याप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, नगरसेविका मयुरी शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव टेंगले, राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्ष आरती गव्हाळे शेंडगे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे आदी उपस्थित होते.
बारामतीच्या कार्यालयात तात्काळ पासपोर्टसह गहाळ झालेल्या पासपोर्ट नव्याने मिळविण्याची सुविधा नाही. जर ही सुविधा बारामतीत उपलब्ध झाली तर पासपोर्टच्या कोणत्याच कामासाठी पुण्याला जावे लागणार नाही. याशिवाय या कार्यालयात येणारी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी स्कॅनर नसल्याने ही कागदपत्रे पोस्टाने पाठविली जातात, त्यामुळे पोलीस चौकशी तयार होण्यासही विलंब होतो, ही बाबही खासदार सुळेंच्या निदर्शनास आणून दिली गेली.
दरम्यान, पोस्ट कार्यालयातही कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो, दोन महिन्यानंतर नागरिकांना आधारकार्डसाठी बोलाविले जाते, अशा तक्रारीही सुळे यांना सांगितल्यानंतर याबाबतही आपण संबंधितांशी बोलू, असे त्या म्हणाल्या.