पुण्यातील आमदारांची मागणी : राज्यशासन सकारात्मक
पुणे – आगामी महापालिका निवडणुका प्रभाग रचनेनुसार असाव्यात, की वॉर्ड रचनेनुसार याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आमदारांनी दोन सदस्यांची प्रभाग रचना करावी, अशी आग्रही मागणी केली. 50 टक्के महिला आरक्षण असल्याने ही पद्धत सोपी जाईल, असा आग्रहदेखील यावेळी धरण्यात आला. दरम्यान, या मागणीस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शविल्याची माहिती वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.
नागपूर अधिवेशानादरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच यांची निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी महापालिकांच्या प्रभाग पद्धतीवर चर्चा झाली. यावेळी वॉर्ड पद्धतीने निवडणुका घ्याव्यात, अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी मांडली. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यास विरोध दर्शविला.
मुंबईसाठी वॉर्ड पद्धत ठेवली, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग रचना करा अशी मागणी आमदार टिंगरे, हडपसरचे चेतन तुपे आणि पिंपरीचे अण्णा बनसोडे यांनी केली. दरम्यान, दोन वेगवेगळ्या मागण्या आल्याने या बैठकीत निर्णय होऊ शकलेला नाही.