बेंगळुरू – मुख्यमंत्रिपदाच्या नियुक्तीबाबत कॉंग्रेसमध्ये कोणताच वाद नाही, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस नेते जी परमेश्वरा यांनी दिले आहे. कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाच्या संबंधात कोणताच निर्णय होत नाही हे पाहिल्यानंतर स्वतः परमेश्वरा यांनीही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आपलेही नाव असल्याचे म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्याला प्रसारमाध्यमांनी बरीच प्रसिद्धी दिली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला. ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीमध्ये कोणताही वाद नाही हे मी स्पष्ट करतो. एक प्रक्रिया अवलंबली जात आहे.
पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची भेट घेत आहेत आणि आज किंवा उद्या ते अंतिम होईल, राज्याचे मुख्यमंत्रिपद दलित समाजाला द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यावर परमेश्वरा म्हणाले की, अशी मागणी करण्यात काहीही गैर नाही, पण साकल्याने विचार करून कॉंग्रेस श्रेष्ठीच यावर निर्णय घेतील.