पंढरपूर : वारंवार एकाच परिसरात विकासाच्या नावाखाली रुंदीकरणाचा घाट घातला जात असेल, तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कर्नाटक राज्यात समावेश करा. तसेच पंढरपूर कॉरिडॉर रद्द न केल्यास पुढील वर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेस कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार असल्याचा इशारा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरातील नागरिक आणि व्यापार्यांनी दिला आहे.
पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर बचाव समितीच्या वतीने नुकतीच विठ्ठल मंदिराच्या पश्चिमव्दार येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर करण्याची घोषणा केली असून यास येथील स्थानिकांचा कडाडून विरोध होत आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून विविध आंदोलने सुरू आहेत. याची दखल घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी व्यापारी आणि बचाव समितीच्या सदस्यांसमवेत बैठक घेतली होती. यामध्ये अधिकार्यांनी दिलेल्या आराखड्याप्रमाणेच वारकरी आणि स्थानिकांना अपेक्षित असलेला विकासाचा आराखडा सादर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती.
पालकमंत्री विखे पाटील यांनी एक महिन्याची मुदत देत हा आराखडा प्रशासनास सादर केल्यानंतर पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यापूर्वीच शासनाने दीड हजार कोटी रुपयाच्या कामासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्याची निविदा प्रसिध्दी केली आहे. तर पंढरपूर नगरपरिषदेकडून मंदिर परिसरात रस्त्याची लांबी, रूंदी, घरांचे सर्व्हेक्षण सुरू आहे. चर्चा करण्याचे आश्वासन दिले असताना देखील आराखड्याची कामे प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याने बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी मंदिरानजिक ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, यावेळी स्थानिकांनी सकाळपासून भजन आंदोलन सुरू केले. यात विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होवून पाठींबा दर्शविला. यावेळी बोलताना बचाव समितीचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी ‘पंढरपूर कॉरिडॉरला आमचा विरोध नसून हा आराखडा मंदिर परिसरात करू नये’, अशी मागणी असल्याचे सांगितले. यापूर्वी या परिसरात तीन वेळा विकासकामे आणि रुंदीकरणासाठी स्थानिकांची घरे ताब्यात घेण्यात आली आहेत. नव्या कॉरिडॉरमध्येदेखील अनेक प्राचीन मठ, मंदिरे, बाधित होणार आहेत. संत नामदेव महाराज यांचे जन्म ठिकाण, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांचा मठ, अमळनेरकर महाराज यांचा मठ आदी महत्वाची ठिकाणे बाधित होणार आहेत. यामुळे पंढरपूर कॉरिडॉर चंद्रभागेचे वाळवंट, ६५ एकर परिसर अथवा नदीवर मोठा पूल उभारून करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
आदित्य फत्तेपूरकर म्हणाले, कॉरिडॉरबाबत चर्चा सुरू असताना प्रशासकीय पातळीवर मात्र याचे वेगाने काम सुरू असल्याने आमचा विश्वासघात केला जात आहे. आमच्यावर वारंवार अन्याय होत असेल, तर तीर्थक्षेत्र पंढरपूरचा समावेश कर्नाटकात राज्यात केला जावा, अशी आम्ही मागणी करू असा इशारा दिला. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ‘कानडा ओ विठ्ठलु कर्नाटकु’ असा अभंग आहे. यामुळे विठुराया मूळचा कर्नाटकातील असून त्याचे हे गाव कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तसेच पुढील वर्षी आषाढीस कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करणार आहोत.होते.