सातारा – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात कृषी विधेयकाचे समर्थन केले आहे, आणि आता ते विरोध करत असल्याने त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र हे खोटे आहे असे जाहीर करावे, अशी खिल्ली रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी पवारांची उडवली.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काही विदेशी सेलिब्रिटींनी ट्विट केले तर त्यावर काही खेळाडू आणि अभिनेत्यांनी विरोधी सूर आळवल्याने वादंग झाले. शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर तसेच अन्य काही सेलिब्रिटींना सल्ला दिला होता. पवारांच्या या सल्ल्याचीही खिल्ली खोत यांनी उडवली.
सदाभाऊ म्हणाले, “शरद पवार कुठे क्रिकेट खेळत होते. त्यांनी कधी बॉलिंग अथवा बॅटिंग केली. पवार कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांनी कधी कुस्ती केली अथवा ते कधी फडावर गेले, याची माहिती नाही. त्यांनी कोणत्या टेलरकडून लंगोट शिवून आणला याची माहिती दिली तर बरे पडेल. राजकारणातील कुस्ती मारणे वेगळे आणि ही कुस्ती वेगळी असते,’ असा टोलाही खोत यांनी पवारांना लगावला.