…तर डॉक्‍टरांवरही गुन्हे दाखल करा – पोलीस आयुक्‍त

  • अवैध धंद्यांबाबत पोलीस निरीक्षकांना दिली तंबी

पिंपरी – अकस्मात मृत्यू दाखल असलेले गुन्हे त्वरित निकाली काढा. जर डॉक्‍टर मृत्यूचे कारण देण्यास टाळाटाळ करीत असतील तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी सूचना नवनियुक्‍त आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस निरीक्षकांना केली. तसेच अवैध धंदेही त्वरीत बंद करा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी त्यांनी पोलीस निरीक्षकांना दिली.

पिंपरी चिंचवडचे तिसरे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्‍तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बुधवारी (दि. 16) प्रथमच पोलीस निरीक्षकांची बैठक पोलीस आयुक्‍तालयात पार पडली. या बैठकीत त्यांनी शहरातील गुन्हे विषयक माहिती घेतली. पहिल्या सत्रात परिमंडळ एकमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, चाकण, दिघी, आळंदी या पोलीस ठाण्यातील निरीक्षकांची बैठक घेतली. तुमच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा, असे कडक शब्दात पोलीस निरीक्षकांना सांगितले.

पेंडींग गुन्हे त्वरित निकाला काढा. अकस्मात मृत्यू नोंद असलेले गुन्हेही निकाली काढा, अशी सूचना दिली. मात्र डॉक्‍टरांकडून मृत्यूचे कारण असलेला अहवाल प्राप्त होत नसल्याने अकस्मात मृत्यू नोंद असलेले गुन्हे निकाली काढता येत नसल्याची सबब पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली. त्यावर पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश म्हणाले, जर डॉक्‍टर मृत्यूचे कारण असलेला अहवाल देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करा, अशी सूचनाही त्यांनी दिली.

दुपारच्या सत्रात परिमंडळ दोनमधील सांगवी, वाकड, हिंजवडी, देहूरोड, चिखली, तळेगाव, एमआयडीसी-तळेगाव या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतही पोलीस आयुक्‍तांनी गुन्हेगाराचा आढावा घेत पेंडींग गुन्हे त्वरित निकाली काढण्याची सूचना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.