अमेरिकेत सॅली वादळामुळे अतिवृष्टीचा इशारा

फ्लोरिडामध्ये आणीबाणी जाहीर

नवेरी बीच (अमेरिका) – अमेरिकेत सॅली वादळामुळे अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आला आहे. फ्लोरिडा आणि अल्बामाच्या किनारपट्टीजवळच्या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे या भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. धोक्‍याच्या इशाऱ्यानुसार तब्बल 30 इंच पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेत अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. 

सॅली वादळाचा केंद्रबिंदू अल्बामाच्या दक्षिणेकडे समुद्रकिनाऱ्यापासून 75 मैल अंतरावर असून ते अल्बामाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्‍यता ‘नॅशनल हरिकेन सेंटर’ने वर्तवली आहे. त्यावेळी सॅली वादळातील वाऱ्याचा वेग ताशी 40 मैल इतका असेल.

आतापर्यंत 4 इंच पाऊस झालेला आहे आणि येत्या 1-2 दिवसांत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. या पावसामुळे निर्माण होणारी पूरस्थिती अतिशय भीषण असेल, असे मियामी युनिव्हर्सिटीचे संशोधक ब्रायन मॅक्‍नॉल्डी यांनी म्हटले आहे. या वादळाची तीव्रता श्रेणी-1 ची असेल, असेही ब्रायन मॅक्‍नॉल्डी यांनी म्हटले आहे.

सोमवारी या वादळाचा वेग ताशी 100 मैल इतका होता आणि त्याचा सध्या वेग ताशी 80 मैल आहे. वादळामुळे सेंट ल्युईस, मिसिसीपीपासून नवेरी, फ्लोरिडापर्यंतच्या भागात 20 इंचांपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. फ्लोरिडातील काही-काही ठिकाणी 30 इंचांपर्यंत पाऊस पडण्याची भीतीही व्यक्‍त होत आहे. त्यामुळे संपूर्ण फ्लोरिडामध्ये आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

अल्बामाच्या किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा धडकत आहेत. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाला मदतकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.