नगर – महापालिकेच्या महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी “पे अँड पार्क’ योजना तात्काळ राबवात निवीदा काढून ठेकेदार नेमण्याची मागणी केली. यावर कॉंग्रेसने मात्र आक्षेप घेतला आहे. शहरातील खड्ड्यांमध्ये रस्ते नष्ट झालेले असताना कोणत्या रस्त्यांच्या बाजूला यांना पे अँड पार्क योजना राबवायची आहे? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पे अँड पार्कचे ठेके यांना निविदा काढून द्यायचे आहेत, असे सवाल करत नागरिकांना भुर्दंड देण्याची योजना यांनी आखली असल्याची खरमरीत टीका कॉंग्रेसने केली आहे.
शहरात रस्त्यांची दुरवस्था आहे. खड्ड्यांमध्ये शहर हरवले आहे. शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या प्रश्नावर शासन व महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण केल्यानंतर शहरात धीम्या गतीने काही भागांमध्ये कामे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होताना दिसत असून यातून लूट सुरू आहे. मनपा आधीच मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून कर संकलन करत आहे. या पैशातून यांना रस्त्यांची कामे करण्याची सद्बुद्धी तर होत नाही. मात्र स्मशानभूमीसाठी पूर्वीपासून जागा आरक्षित असताना देखील आरक्षित नसणारी जागा 32 कोटी रुपयांच्या चढ्या भावाने घेण्याचा घाट हे लोक घालत आहेत. या खरेदीसाठी पैसे कमी पडतात की काय म्हणूनच यांनी आता शहरात पे अँड पार्क योजना राबवण्याची मागणी लावून धरल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
पे अँड पार्क हा विषय आर्थिक बाबीशी निगडित असून याबाबत मनपाने अद्याप कोणतेच धोरण निश्चित केलेले नाही. राष्ट्रवादी, भाजप नगरसेवकांच्या प्रभागामध्ये रस्त्यांची दैन्यावस्था असताना यांनी पे अँड पार्कसाठी धरलेला आग्रह चुकीचा आहे. यापूर्वी देखील किरण काळे यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा योजना खासगीकरणाचा डाव, तिप्पट करवाढीचा डाव कॉंग्रेसने उलथून लावला आहे. यांचा हा ही लुटीचा डाव कॉंग्रेस उधळून लावेल, असा इशारा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे व ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी प्र्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.