नाथाचीवाडी येथील घटना ः यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
यवत – शेतकऱ्याने आपल्या शेताला पाणी देण्यासाठी नवीन सहा इंची पीव्हीसी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले असता अज्ञात आरोपीने रात्रीच्या वेळी ही पाइपलाइन फोडून विद्युत पंपाची चोरी केल्याची घटना दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. 19) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेबाबत शेतकरी अर्जुन रामचंद्र दोरगे (वय 67, यवत, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, दोरगे यांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी पीव्हीसी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले होते. चारी खोदून पाइपलाइन जोडली देखील होती. ती फक्त बुजबणे बाकी होते. शनिवारी (दि. 21) सकाळी दोरगे खोदलेली चारी बुजविण्यासाठी गेले असता त्यांना अज्ञातांनी सर्व पाइपलाइन कोणत्यातरी हत्याराने फोडल्याचे व विहिरीवरील विद्युत पंप चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
या घटनेमुळे अर्जुन दोरगे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोरगे यांनी अज्ञात आरोपीविरोधात यवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.