नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
महाळुंगे इंगळे-पबजी या गेमचे तरुणाईला अक्षरश: वेड लागले आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचे ऐकायला मिळत होते. पबजी गेममुळे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या उच्चशिक्षित तरुणाने चाकण परिसरात चांगलाच गोंधळ घातला. या तरुणाला नागरिकांनी अखेर चाकण पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या हवाली केले.
अजित शिवाजी पवार (वय 25, सध्या रा. मेदनकरवाडी, चाकण) असे या तरुणाचे नाव असून, तो मुळचा इंदापूर परिसतील असल्याचे पोलिसांना सांगत असून, पोलीस त्याच्या मूळ गावाचा शोध घेत आहेत. सध्या तो चाकण पोलिसांच्या ताब्यात आहे. सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे या 25 वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती अचानक ढासळल्याचे येथील त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक झालेल्या या तरुणाकडून पबजी गेमप्रमाणे हातवारे हावभाव करण्यात येत आहेत. त्याने काही पाळीव प्राण्यांवर खरेखुरे हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर हातात लाकडी दांडके घेऊन गोळ्या झाडत असल्याचे हावभाव करण्यात येत आहेत. संबंधित रुग्णालयात योग्य उपचारासाठी दाखल करावे लागणार असून, पोलीस त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.