प्रियांका यांच्या सुरक्षाविषयक त्रुटीचे प्रकरण
नवी दिल्ली, दि.3 -कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीच्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या येथील निवासस्थानाच्या आवारात एका आगंतुक कारने विनाअडथळा प्रवेश केल्याचा विषय गाजत आहे. मात्र, ती कार प्रियांका यांचे बंधू राहुल गांधी यांचीच असावी, असा सुरक्षारक्षकांचा समज झाल्याने तो प्रकार घडल्याचे आता समोर आले आहे.
प्रियांका यांच्या निवासस्थानाच्या आवारात काही दिवसांपूर्वी अचानकपणे एक कार पोहचली. त्या कारमधून काही महिलांसह एकाच कुटूंबातील सात सदस्य उतरले. त्यावेळी प्रियांका निवासस्थानाबाहेरच होत्या. आगंतुक पाहुण्यांनी प्रियांका यांच्या जवळ जात त्यांच्यासमवेत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानुसार प्रियांका यांनी त्यांच्या समवेत फोटो काढून त्यांच्याशी संवादही साधला. मात्र, केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) सुरक्षा असूनही कुठल्या चौकशीविना कार आतपर्यंत थेट प्रवेश कसा काय मिळाला, असा प्रश्न त्यातून उभा राहिला. त्या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याबाबत बोलताना उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.