भिकाऱ्याचे आयुष्य जगणारा तरुण मायदेशी रवाना 

दीपेश सुराणा
माणुसकीचे दर्शन ः नियतीच्या दृष्टचक्रातून झाली सुटका

पिंपरी – नियती कोणाशी काय खेळ खेळेल, हे सांगता येत नाही. मूळच्या नेपाळ येथील 32 वर्षीय तरुणाचा एक पाय अपघातामुळे अधू झाला होता. गेल्या दीड वर्षांपासून तो आकुर्डी रेल्वे स्थानक येथे भिकाऱ्याचे आयुष्य जगत होता. स्टेशन मास्तर रतन रजक यांच्या प्रयत्नामुळे हा तरुण शनिवारी (दि. 20) पुन्हा आपल्या मायदेशी नेपाळला रवाना झाला. नियतीच्या दृष्टचक्रातूनच त्याची एकप्रकारे सुटकाच झाली. आपल्या देशात परत जाताना त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू साचले होते.

सिद्धराज बलराम डुंगाना हा 32 वर्षीय तरुण. नेपाळमधील लमकीचुहा नगरपालिका, ब्लॉक क्रमांक 6, पिंपरकोटी, कैलाली हे त्याचे मूळ गाव. कान्हेफाटा येथे दोन वर्षापूर्वी तो कामानिमित्त आला होता. हेल्परचे काम करून स्वत:चा उदरनिर्वाह चालवत होता. कान्हेफाटा येथे रस्त्यालगत झोपला असताना त्याचा अपघात झाला. त्यामध्ये त्याचा उजवा पाय गुडघ्यापर्यंत अधू झाला. त्यानंतर तो गेल्या दीड वर्षापासून आकुर्डी रेल्वे स्थानक येथे भीक मागून आयुष्य जगत होता. स्टेशन मास्तर रतन रजक हे त्याच्याकडे लक्ष देत असत. त्याची नेहमी विचारपूस करीत. त्यांच्याकडे तिकाटाची माहिती विचारण्यासाठी एक नेपाळ भागातील सुरजबहादूर राऊल हा तरुण आला होता.

त्याला रतन रजक यांनी संबंधित तरुणाची माहिती दिली. त्यानंतर, राऊल याने “नेपाल न्यूज’ या वृत्तपत्राला बातमी दिली. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवासी नेपाळ संघाचे चार तरुण आकुर्डी रेल्वे स्थानक येथे आज दुपारी तीनच्या सुमारास चौकशीसाठी आले. संबंधित तरुणाची ओळख पटल्यानंतर त्याला पुन्हा नेपाळला घेऊन जाण्याची तयारी संबंधितांनी दर्शविली.

सिद्धराजची अवस्था खूपच वाईट होती. त्याची दाढी, डोक्‍यावरचे केस वाढलेले होते. तसेच, अंगावरचे कपडेही मळके होते. त्याला आकुर्डी रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहात आंघोळ घालण्यात आली. त्याची दाढी, कटींग करण्यात आली. त्यानंतर, त्याच्या पायाला झालेली जखम स्वच्छ करून औषधोपचार करण्यात आले. तसेच, त्याला घालण्यासाठी नवीन कपडे देण्यात आले. त्याशिवाय, त्याच्या प्रवास खर्चासाठी दीड हजार रुपये सोबत देण्यात आले. त्याला शाल, श्रीफळ आणि गांधी टोपी देऊन महाराष्ट्रीयन पद्धतीने निरोप देण्यात आला.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो आकुर्डी रेल्वे स्थानकातून पुणे येथे गेला. तेथून नेपाळसाठी रवाना झाला. रतन रजक यांना तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस व नागरीक मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिल पालकर, विठ्ठल सहाणे यांच्यासह काही स्वयंसेवकांनी त्यासाठी सहकार्य केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)