न्यूयॉर्क : करोनाला रोखण्यासाठी करोना प्रतिबंधित लस हेच जगातील सर्वात प्रभावी शस्त्र आहे. साधारणपणे जगातील सर्वच देशात करोना लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहेत. मात्र, जगात अजूनही असे काही महाभाग आहेत जे लसीवर संशय व्यक्त करत असून लस घेण्याची त्यांची इच्छा नसल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतही असे प्रकार घडत आहेत. मात्र अशा व्यक्तींना एका कंपनीने चांगलीच अद्दल घडवली आहे. कंपनीने तब्बल 1400 लोकांना घरचा रस्ता दाखवल्याचे समोर आले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, हे प्रकरण न्यूयॉर्क स्टेटमधील सर्वात मोठ्या हेल्थकेअर प्रोव्हायडर नॉर्थवेल हेल्थशी संबंधित आहे. त्यांनी करोना लस घेण्यास नकार देणाऱ्या तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कडून टाकले आहे. हेल्थकेअरचे प्रवक्ता जो केम्प यांनी यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे.
न्यूयॉर्कमधील नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यांपैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
कॅलिफोर्नियासह काही इतर राज्यांनीही, असा नियम बनवला आहे. परंतु, नॉर्थवेल हेल्थच्या या कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिल्याने, त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली. नॉर्थवेल हेल्थने येथे काम करणाऱ्या सर्व क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल स्टाफसाठी कोरोना लस अनिवार्य केली होती. केम्पने म्हटले आहे, की आमचे लक्ष कर्मचाऱ्यांना काढून टाकणे नव्हते, तर प्रत्येकाला कोरोना लस देण्याचे होते.