न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमधील घटना
पिंपरी – एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीची एक्सरे मशीनद्वारे तपासणी करत असताना अचानक एक्सरे मशीन फुटल्याने चिमुकली भाजली. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर, पिंपरी येथे घडली.
शार्वी भूषण देशमुख (वय 1) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. शार्वीला युरिन इन्फेक्शन झाल्याने काही तपासण्या करण्यासाठी शार्वीच्या पालकांना पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी आणले होते. शार्वीला तपासणीसाठी साडेतीन वाजता लॅबमध्ये घेतले.
मशीनमध्ये शार्वीची तपासणी सुरू असताना अचानक एक्सरे मशीनचा काही भाग फुटला. तसेच या मशीनमधील रसायन शार्वी, तिची आई व आजोबा यांच्या अंगावर सांडले. ही घटना घडल्यावर येथील कर्मचारी दूर पळाले. धूर झाल्याने आजोबांनी शार्वीला त्वरीत त्या खोलीतून बाहेर नेले. यात शार्वी, तिची आई व आजोबा हे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर काहीही झाले नसल्याचे सांगत डॉक्टरांनी शार्वीच्या पालकांना परत पाठवले. सेंटरमधील डॉक्टरांनी या घटनेत हलगर्जीपणा दाखवला असून कोणीही मदतीस आले नाही. तसेच डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे प्रतिप्रश्न केल्याचा आरोप शार्वीची आई प्रियंका यांनी फिर्यादीत केला आहे.
दरम्यान ही घटना वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने थेट गुन्हा दाखल करता येणार नाही. याबाबतची कागदपत्र ससून रुग्णालयाच्या समितीकडे पाठविणार आहे. त्या समितीचा निर्णय आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरचे परिचालन प्रमुख (ऑपरेशनल हेड) गिरीष मोटे म्हणाले, “एक्से रे ट्यूब फुटल्याने त्यातील तेल अंगावर उडाले. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्वरीत बाळाच्या अंगावर पाणी टाकून प्रथमोपचार केले. कोणीही बाळाच्या पालकांशी उद्धटपणे बोललेले नाही.