शिरूर -येथील बाबुरावनगरमधील बाधित कामगारांच्या संपर्कात आलेल्या चारपैकी त्याच्या तीन मुलांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पाषाण मळा हद्दीतील आणखी एका कामगाराची पत्नी पॉझिटिव्ह आल्याने एकाचदिवशी शहरात चारजण बाधित झाले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली. शिरूर कोविड केअर सेंटरमध्ये (दि.30) जून रोजी 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी चार पॉझिटिव्ह आढळले आहेत.
बाबुराव नगर येथील कंपनी कामगाराच्या 14, 12, 10 वर्षांची मुले त्यात दोन मुली व एका मुलाचा बाधितामध्ये समावेश आहे. त्याची पत्नी निगेटिव्ह आढळली आहे. एकाचवेळी पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्ण बाबुरावनगरमध्ये आढळल्याने स्थानिक नागरिक पुन्हा एकदा हादरले आहेत. याअगोदरच पाषाण मळा शिरूर हद्दीतील इमारत व बाबुरावनगरमधील इमारती कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्या आहेत. परंतु पुन्हा त्यात इमारतीतील तीन लहान मुले बाधित आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ही तीन लहान मुले कोणाकोणाच्या संपर्कात आली आहेत, याबाबत तपासणी सुरू आहे.