खोटी फिर्याद देणाऱ्यावर गुन्हा
पुणे – कामगारांच्या कष्टाचे पैसे खर्च करून ठेकेदारानीच लुटमारीचा बनाव करत पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकली. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून ठेकेदाराचा भांडाफोड केला. खोटी फिर्याद दिल्यामुळे भाऊसाहेब लाला वाळुंजकर या ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हांडेवाडी रस्त्यावरून जाताना दुचाकीवील चोरट्यांनी शस्त्र दाखवून 70 हजार रुपये लुटल्याची तक्रार भाऊसाहेब याने 20 डिसेंबरला कोंढवा पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला होता. भाउसाहेब याने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध घेतला जात होता. हेल्मेट घालून आलेल्या आरोपींनी लुबाडल्याचे भाऊसाहेबने सांगितले होते.
त्यानुसार पोलिसांनी परिसरातील 20 ते 25 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यामध्ये फक्त भाउसाहेब दुचाकीवरून जाताना दिसत होता. पण, त्याने वर्णन केलेले आरोपी फुटेजमध्ये दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांना भाउसाहेबवरच संशय आला.
पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने “कामगाराच्या पगारासाठी बांधकाम व्यावसायिक दर आठवड्याला पैसे देत होता. मात्र, पैसे खर्च झाल्यामुळे खोटी तक्रार दिली,’ अशी कबुली भाऊसाहेबने दिली.