सातारा – छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील कोविड हॉस्पिटलचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या 9 तारखेच्या दरम्यान या हॉस्पिटलचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. या कोविड हॉस्पिटलच्या कामाची पाहणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केली.
उर्वरित कामे तातडीने करुन कोविड हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी लवकरात लवकर सज्ज करा, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. मीही करोनातून बरा झालो असून प्लाझ्मा दान करण्याची इच्छा जाहीर केली आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
राज्यात काही महिन्यांपासून करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य शासनाने जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला आहे. काही सामाजिक संस्था, स्वयंसेवकांनीही पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी एक करोना हॉस्पिटल असावे सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी मान्यता दिली. या हॉस्पिटलमध्ये 234 ऑक्सिजन बेड व 52 आयसीयू बेड असणार आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांसाठीही चार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
बांधकाम व विद्युत सुविधेसाठीपाच कोटी 92 लाख 70 हजार, वैद्यकीय उपकरणांसाठी सहा कोटी 84 लाख 97 हजार 2061 रुपये तर मनुष्यबळ व इतर गोष्टींसाठी सहा महिन्यांसाठी 13 कोटी 99 लाख 32 हजार इतका खर्च करण्यात आला आहे. रुग्णांची तपासणी करुन या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी राज्य शासनाबरोबर स्वयंसेवक, उद्योगांनी मदत केली आहे.
या कोविड हॉस्पिटलचे उदघाटन 9 तारखेच्या दरम्यान होणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील बरेच करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
या रुग्णांमध्ये करोना विषाणशी लढण्यासाठी अँन्टिबॉडीज तयार झालेल्या असतात. या अँन्टिबॉडीज प्लाझ्माच्या उपचार पद्धतीने गंभीर करोनाबाधितांवर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन करून “मीही करोनातून बरा झालो आहे.
आमदार मकरंद पाटील करणार “प्लाझ्मा’ दान
मलाही करोना संसर्ग झाला होता. आज मी पूर्णपणे बरा झालो आहे. नागरिकांनी करोनाविषयी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. प्लाझमा उपचार पद्धती करोना झालेल्या रुग्णांसाठी खूप उपयोगी पडत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्लाझमा दान करावे. मीही प्लाझ्मा दान करणार असल्याचेही आमदार मकरंद पाटील यांनी कोविड हॉस्पिटलच्या पाहणी प्रसंगी सांगितले.