पुणे – महापालिकेने दिलेल्या “नियमांच्या मेनुकार्ड’ प्रमाणे तयारी करीत सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर शहरातील हॉटेल्स उपवासाच्या दिवशी सोमवारी पुन्हा सुरू झाली. हॉटेल व्यावसायिकांनी पुनःश्च हरिओम म्हणत हॉटेल्स उघडली. मात्र, गणेश चतुर्थी असल्याने पहिल्या दिवशी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. सुमारे 30 टक्केच पुणेकरांनी व्हेज रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेतला, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.
शहरातील प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल व्यावसायिक सौरभ अमराळे म्हणाले की, चतुर्थीमुळे अनेकांचा उपवास असल्याने गर्दी कमी होती; परंतु डाइन इन सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आहे. करोनामुळे मध्यमवर्गीय लोकांचे आर्थिक हाल सुरू असल्याने आम्ही बिर्याणीचे दर 25 टक्क्यांनी कमी केले आहेत.
दरम्यान, मंगळवारपासून शहरातील डाइन इन सेवेला चांगली गर्दी होईल, असा विश्वास हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला.
नामांकित हॉटेल्स बंदच…
शहरातील नामांकित हॉटेल्स, बिर्याणी हाऊस सोमवारी बंदच असल्याचे पाहायला मिळाले. चतुर्थीमुळे ग्राहक येणार नाहीत, हे गृहित धरून अनेकांनी आपापली हॉटेल्स उघडली नाहीत. बंद असणाऱ्या हॉटेलांपैकी नॉन व्हेज हॉटेल्सची संख्या लक्षणीय होती.