लोणावळा -उधेवाडी राजमाची ग्रामपंचायत हद्दीमधील फणसराई या वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांची पाण्यासाठी अक्षरशः वणवण सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची तसेच दैनंदिन वापराच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी फणसराई मधील ग्रामस्थांना रोजच्या रोज पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
उधेवाडी राजमाची हे गाव लोणावळा शहरापासून केवळ काही किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. मात्र येथील ग्रामस्थ, आजही मूलभूत सोयीसुविधा पासून वंचित आहेत.तर याठिकाणी कोणत्याही स्वरूपाची पाण्याची सोय नाही. फणसराई याठिकाणी कोणत्याही स्वरूपाच्या नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत नाही. काही वर्षापूर्वी एका संस्थेने याठिकाणी ग्रामस्थांसाठी एक विहीर बांधून दिली. पावसाळ्यात आणि नंतर साधारण जानेवारी महिन्यापर्यंत या विहिरीत पाणी राहते.
मात्र त्यानंतर ही विहीर तळ गाठते आणि तेथून सुरू होती ग्रामस्थांची वणवण. जवळपास पाण्याचा कोणताही स्त्रोत नसल्याने एकतर सात ते आठ किलोमीटर दूर असलेल्या शिरोता डॅमच्या बॅक वॉटर ला किंवा साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पटेल डॅमवर पाणी आणण्यासाठी डोक्यावर हंडे रचून पायपीट करावी लागते. यात या आदिवासींचा सगळा दिवस मोडतो. असे असताना शासनाचे किंवा लोकप्रतिनिधीचे याठिकाणी लक्ष नसणं ही केवळ दुर्दैवाची बाब आहे. याठिकाणी आता पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.
पायपीट थांबविण्यासाठी दानशूर व्यक्तींचा पुढाकार
फणसराई येथील ग्रामस्थांची पायपीट बघून आदिवासी पाड्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सोनल बालघरे यांनी अनेक संस्थांव व्यक्तींकडे ही व्यथा मांडली. त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देत अँग्लो इंडियन रिसॉर्ट नावाने हॉटेल व्यवसाय करणारे आर. सी. वाला यांनी फणसराई येथील आदिवासींसाठी आतापर्यंत दोन वेळा पाण्याचे टॅंकर पाठवून दिले. याशिवाय 10 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देण्याचे आश्वासन देऊन स्थानिक लोकांच्या सहकार्याने एक चौथरा देखील बांधून घेतला आहे. हे करीत असताना त्यांनी या चौथऱ्यासाठी काम करणाऱ्या आदिवासींना त्यांची हजेरी देखील दिली. पुढे जाऊन याठिकाणी जी विहीर आहे तिला अजून खोल करून जवळपास एखादी बोरवेल करून सोलार पंप बसवण्याचा त्यांचा मानस आहे.
======================