सहकारनगर – प्रभाग क्रमांक 30 मध्ये पानमळा, दांडेकर पूल वसाहत, गणेश मळा परिसरात नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर परिसरातील युवा नेतृत्त्व म्हणून निवडून आलेले नगरसेवक आनंद रिठे यांनी प्रभागात अनेक कामे करताना स्वखर्चातून सामाजिक उपक्रमही राबविलेले आहे.
परंतु, या प्रभागात समस्या वाढतच असल्याचे विरोधकांचे मत आहे. स्वच्छतागृहाचे काम दूरदृष्टी न ठेवता केल्याने अस्वच्छता वाढली आहे. पदपथावर अतिक्रमण आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच मलवाहिनीच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विकासकामांच्या नावाखाली निधीची केवळ उधळपट्टी केल्याचेही विरोधकांचे म्हणणे आहे.
प्रभागात मोठे क्रीडांगण तयार केले आहे. सुसज्ज जिम व योगा केंद्राचे काम सुरू असून दोन महिन्यांत काम पूर्ण होईल. करोना काळातही नागरिकांची काळजी घेत कामे करण्यात आली. आरोग्य विषयक जनजागृतीसाठी योगा शिबिरे घेण्यात येतात. अंत्यविधीसाठी स्वखर्चातून वैकुंठ रथ उपलब्ध करण्यात आला आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप केले जात आहे. – आनंद रिठे, नगरसेवक, भाजप
आज प्रभाग क्र.30ची स्थिती पाहता खंत वाटते. भाजपचे तीन नगरसेवक तसेच सर्वाधिक निधी मिळूनही जनता वसाहतीतील लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. गेल्या चार वर्षात ठोस विकासकामे झालेलीच नाहीत. फक्त मतांची गोळाबेरीज करण्यासाठी जनतावसाहतकडे पाहिले जाते. करोना काळात तर आमच्या भागाकडे पाठ फिरविली.
– सूरज लोखंडे, अध्यक्ष, शिवसेना पर्वती मतदार संघ
प्रभागात अपूरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. गटारे तुुंबत असून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोट्यवधीची कामे फक्त कागदोपत्रीच झाली आहेत. पदपथावर परवानगी नसतानाही वाचनालय झाले त्यातही तळीराम दारूपित बसतात. प्राथमिक समस्या तशाच असताना अशा कामांचा काय उपयोग? – अभिजित बारवकर, पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस
मागील चार वर्षामध्ये एकाच जागेवर चारही सभासद बजेट देत होती. परंतु, काम कोणीही केले नाही. बजेट ओव्हारलॅप केले आहे. सभासदांना बजेट जास्त असतानाही कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. मर्जीतील ठेकेदार गब्बर झाले आहेत. विकासकामांना खीळ बसली आहे.
– राहुल तुपेरे, शहर उपाध्यक्ष, मनसे