पिंपरी -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे नगरसेवक स्वर्गीय दत्ता साने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. दत्ता साने हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाघ होते. त्यांच्या जाण्यामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. साने कुटुंबाच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पवार कुटुंबिय सदैव राहिल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.
दत्ता साने यांचे गतवर्षी करोनामुळे निधन झाले होते. निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, युवा नेते पार्थ पवार यांनी साने कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी साने कुटुंबीयांची भेट घेतली व आस्थेने विचारपूस केली.
चिखली परिसरात वर्चस्व राखून असलेले व भोसरी विधानसभेचे प्रमुख दावेदार म्हणून दत्ता साने यांची गणना होत होती. गतवर्षी करोनामध्ये नागरिकांसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना साने यांना करोनाची लागण झाली होती. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या दत्ता साने यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.
आज अजित पवार हे एका सहकारी बॅंकेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी शहरात आले होते. नियोजित दौरा नसतानाही अजित पवार यांनी थेट साने यांचे घर गाठून त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करत दिलासा दिला. यावेळी सुमारे पंधरा मिनिटे ते साने यांच्या घरी थांबले होते. आगामी निवडणुकीमध्येही पक्षाची ताकद साने कुटुंबियांच्या सोबत राहिल, असेही पवार म्हणाले. यावेळी नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, नाना काटे, वैशाली काळभोर, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, आतिष बारणे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
अवघ्या सहा महिन्यांवर आलेली महापालिका निवडणूक, चिखली परिसरात राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली पोकळी, दत्ता साने यांचे चिरंजीव यश साने यांनी सुरू केलेले सामाजिक कार्य आणि अजित पवार यांनी साने कुटुंबियांची घेतलेली अचानक भेट यामुळे पवार यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
==============