मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या फ्लोअर टेस्टसाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे. अनेक आमदारांचा शिंदेंना पाठिंबा असल्याने महाविकास आघाडी भवितव्य अंधारात दिसत आहेत. त्यातच महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना गुरुवारी सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगितले आहे. मात्र ही बहुमत चाचणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली न होता, राज्यपाल बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्ष नेमण्याची शक्यता आहे.
राज्यपाल आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून हंगामी अध्यक्ष नेमू शकतात, अशी शक्यता विधितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
याआाधी न्यायाधीश केहर यांच्या घटनापीठाने सभागृहाच्या विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना त्यांच्याऐवजी हंगामी अध्यक्ष यांनी बहुमत चाचणीसाठीच्या विधिमंडळ अधिवेशनाची कारवाई पाहावी, असा निर्णय दिला होता. या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल बहुमत चाचणीच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षांची नेमणूक करू शकतात.