पुणे – महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या फ्लोअर टेस्टसाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारची वाट खडतर आहे. तर शिवसेनेची स्थिती अजुनच बिकट आहे. त्यातच शिवसेनेला बहुमत चाचणी आधीच आणखी एक जबर धक्का बसला आहे.
पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची युती तोडावी अशी भूमिका शिवतारे यांनी जाहीर केली. अगदी हीच भूमिका शिंदे गटाची आहे.
शिवतारे म्हणाले की, एकनाथ शिंदेंची भूमिका ही संघटनेसाठी आहे. त्यामुळे आम्ही शिंदे यांच्यासोबत जाणं आवश्यक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावू नका, अशी विनंती सर्वांनी केली आहे. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी ती मान्य केली नसल्याचंही शिवतारे यांनी नमूद केलं.
दरम्यान एकनाथ शिंदेसह आमदार सुरतला गेले होते, त्यावेळी आपण व्हॉट्स ऍपवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांना पत्र पाठवून भूमिका मांडली होती. मात्र आपल्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी नमूद केलं.