Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला. एका स्थानकाजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या वेदनादायक अपघातात २८० जणांचा मृत्यू झाला आहे तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या मोठ्या अपघातानंतर ओडीशामध्ये माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले आहे. जखमींना वाचवण्यासाठी रक्ताची गरज असल्याने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
यावेळी सरकारकडून कोणतेही आवाहन करण्यात आले नव्हते, तरी देखील लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटल गाठले. येथील नगरिकांचे कौतुकास्पद कार्य पाहून अनेकजण भारावून गेले आहेत. एवढ्या संख्येने लोक रक्तदान करण्यासाठी आल्याने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकांना जखमींचे प्राण वाचवायचे आहेत. कठीण काळातही असे चित्र देशाला दिसल्याने जगात आजही माणुसकी शिल्लक असल्याचे हे या व्हिडीओतून पाहायला मिळते.
#WATCH ओडिशा: बालासोर ट्रेन हादसे के बाद रक्तदान करने के लिए अस्पताल में स्थानीय लोगों की भीड़ देखने को मिली।#BalasoreTrainAccident pic.twitter.com/rsOjTcviPO
— ANI_HindiNews (@AHindinews) June 3, 2023
या घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. ओडिशामध्ये आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईंकांना १० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर, अपघातातील गंभीर जखमींना २ लाख रुपये तर किरकोळ जखमी असणाऱ्या प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे.
नेमकं काय घडलं?
ओडिशातील बहानगा गावाजवळ हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. त्यानंतर अचानक या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली. यातच २८० जणांचा मृत्यू झाला आणि ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडला.