वॉशिंग्टन – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर आत्तापर्यंत अमेरिकेने तेथील 3200 नागरीकांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. काल एका दिवसात त्यांनी काबुलमधून 1100 लोकांना तेथून बाहेर काढले आहे.
या सगळ्या अमेरिकन नागरीकांना तेथून अमेरिकेत परत नेण्यासाठी एकूण 13 विमाने वापरण्यात आली. तसेच लष्कराच्या मालवाहतुकीसाठी वापरली जाणारी सी 17 जातीची 12 विमानेही वापरण्यात आली.
तालिबानने अमेरिकन नागरीकांच्या सुखरूप परतण्याची हमी दिली होती अशी माहिती व्हाइट हाउसने दिली आहे. अफगाणिस्तानातील ज्या नागरीकांनी अमेरिकेला त्यांच्या मोहीमेत मदत केली आहे अशा लोकांनाही अमेरिकेने आपल्या देशात आश्रय दिला आहे.
असे एकूण दोन हजार लोक आहेत. त्यांच्या जीवाला तालिबानकडून धोका होऊ शकतो म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी सांगितले की लष्कराच्या मालवाहू विमानातून सरासरी तीनशे नागरीकांना तेथून हलवण्यात आले.
काबुल विमानतळावर अमेरिकेचे विमान पकडण्यासाठी येणाऱ्या काही जणांवर दगडफेक करण्यात आली किंवा त्यांना रोखण्याचाही प्रकार झाला असेही त्यांनी नमूद केले.
सर्व अमेरिकन नागरीक आणि अमेरिकेला मदत करणारे अफगाणी नागरीक यांना तेथून पुर्णपणे हलवेपर्यंत अमेरिकेने तेथील विमान सेवा सुरूच ठेवावी अशी मागणीही बायडेन प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या ऑपरेशनवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लक्ष ठेऊन आहेत.