पुणे – पोलीस आयुक्तालयात चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या एकाने स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली. त्याने नागरिसुविधा केंद्रावर वाद झाल्यानंतर प्रथम स्वत:च्या हाताची नस कापून घेतली. यानंतर ज्वलनशिल पदार्थ अंगावर टाकून स्वत:ला पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेतच त्याने पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून गुन्हे शाखेच्या कार्यालयापर्यंत धाव घेतली.
तेथे तो खाली पडल्यावर जवळच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोत्याने त्याची आग विझवली. त्याच्या तोंड, हात व छातीचा काही भाग भाजला गेला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (42,रा.खडकी) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पिंगळे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तलय कार्यालयात आला होता. तेथे चारित्र्य पडताळणी कक्षेत त्याचेवर दोन गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याने माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे सांगत अचानक सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत पेटवून घेतले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पेट घेतलेल्या अवस्थेतच पोलीस आयुक्तलयाचे कार्यालयात पळत गुन्हे शाखेच्या इमारतीकडे गेला. गेटवरील बंदोबस्तावरील कर्मचारी व गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्याच्या मागे धावत गेले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अग्नीशामक दलाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले . भाजलेल्या अवस्थेत पिंगळेला ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नाव साधर्म्यामुळे गडबड
सुरेश पिंगळे या नावाच्या व्यक्तीवर सहकारनगर, कोथरुड व समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुरेश पिंगळेवर एकही गुन्हा दाखल नाही. नामसाधर्म्यामुळे त्याचा चारित्र्यपडताळणीचा अर्ज फेटाळण्यात येत होता. यासंदर्भात त्याने खडकी पोलीस स्टेशन व संबंधीत अपर पोलीस आयुक्तांकडे दादही मागितली असल्याचे समजते. त्याला पासपोर्ट काढून परदेशात नोकरीसाठी जायचे होते.
पोलीस आयुक्तालयात आम्ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी बसलो आहोत. आम्ही प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेत असतो. मात्र पोलीस आयुक्तालयाच्या दारातच अशी घटना घडल्याने मोठे दुख होत आहे -अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त)